बाबासाहेब परीट - बिळाशी -कर्णकर्कश्श आवाजाने अनेकांना कायमचे बहिरेपण आले आहे, तर कवठेएकंदसारख्या गावात अनेकांनी प्राण गमावले आहेत. या सर्व बाबींचे गांभीर्य ओळखून पाडळी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी, यशवंत हायस्कूलच्या मुलांनी व ग्रामस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प केला आहे. गेली सलग दोन वर्षे फटाक्यांविना दिवाळी साजरी केली असल्याने, यावर्षी हे गाव हॅट्ट्रिक साधणार आहे. याकामी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जि. प. शाळांनी पुढाकार घेतला आहे.गेली दोन वर्षे पाडळी या गावाने संपूर्ण जिल्ह्यात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने नावलौकिक मिळविला आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, होणारे आर्थिक नुकसान, अपघातामुळे झालेली जीवितहानी याबाबत बाबासाहेब परीट व विजयकुमार जोखे यांनी मुलांना माहिती दिली. मुलांनीही उत्स्फूर्तपणे फटाके न उडविण्याबद्दल निर्धार केला. यावेळी सत्यजित नारायण पाटील हा तिसरीतला विद्यार्थी म्हणाला, ‘‘आम्ही फटाके उडविणार नाही, त्या पैशाची पुस्तके खरेदी करू.आमच्या आजोबांनी फटाके आणलेत, पण मी त्यांना ते शेतात वानरांसाठी उडवा, असे सांगितले’’. सानिका नलवडे ही सहावीतील विद्यार्थिनी म्हणाली, ‘‘सर, आम्ही सर्व मुले फटाके उडविणार नाही. पण गावातील मोठ्या माणसांनी पण हे पाळले पाहिजे. कारण काहीही असो, पण फटाके उडवले नाय पाहिजे.’’या मोहिमेत गावातील सरपंच, उपसरपंच, संदेश पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. सुनील पाटील, अरुण पाटील, हिम्मत पाटील, प्रा. विजयकुमार जोखे, माजी उपसरपंच बाबासाहेब पाटील, सुभाष पाटील, आणि शिक्षकांंनी परिश्रम घेतले आहेत. विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, वक्तृत्व व किल्ला स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावर्षी ‘फटाके नको पुस्तके वाचू’ अभियानभिलवडीत उपक्रम : संस्कार केंद्राचा सहभागभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील साने गुरूजी केंद्राच्यावतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘फटाके नको पुस्तके वाचू’ अभियान राबविण्यात येत आहे.विद्यार्थ्यांनी फटाके उडवू नयेत, त्याऐवजी पुस्तके विकत घ्यावीत व त्यांचे वाचन करावे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम समजून घ्यावेत, या हेतूने गेल्या पाच-सहा वर्षांपासून संस्कार केंद्राचे प्रमुख सुभाष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष जागृती अभियान राबविले जात आहे. यंदाच्या वर्षी भिलवडीबरोबरच अंकलखोप, धनगाव या गावात हे अभियान राबविले जात आहे. यावर्षी संस्कार केंद्राच्या माध्यमातून सुमारे नऊशे ‘साधना बालकुमार दिवाळी अंकां’ची खरेदी केली आहे. २५ रुपये किमतीचा हा अंक १0 रुपये इतक्या नाममात्र सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय ‘श्यामची आई, गंमत गाणी, बोधकथा, संस्कारकथा, बालगीते, साने गुरुजींचे वाङ्मय’ ही सर्व पुस्तके सवलतीच्या दरात वितरित केली आहेत. कमीत कमी फटाके उडवावेत. त्याऐवजी सुट्टीत जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. (वार्ताहर)
पाडळीत यंदाही फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प
By admin | Updated: October 21, 2014 23:37 IST