गतवर्षी २८ मार्चपासून सिव्हिल रुग्णालयात केवळ कोविडबाधित व संशयित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत कोविड रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने सुमारे चारशे बेडची व्यवस्था असलेल्या मिरज सिव्हिलमध्ये केवळ ४० कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. मिरज सिव्हिलमध्ये कोविडशिवाय इतर रुग्णांवर उपचार बंद असल्याने गरीब सामान्य रुग्णांचे हाल सुरू आहेत. सांगली सिव्हिलवर मोठा ताण आहे. या पार्श्वभूमीवर व पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मिरज सिव्हिलमधील काही खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित करून कोविडव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी वाॅर्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शल्यचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, कान, नाक, घसा या पाच विभागांचे बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
मिरज सिव्हिलमध्ये बाह्य व आंतररुग्ण विभाग सोमवारपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST