शिराळा : सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणणे, कारखान्यांची प्रगती रोखणे, चांगले काम करू न देणे अशा शासनाच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघण्यास वेळ लागणार नाही. आता काळाची गरज ओळखून सभासदांचे हक्क अबाधित ठेवून सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्यादृष्टीने पावले उचलावी लागतील, असा इशारा विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी दिला.भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे कारखान्याच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सर्जेरावदादा बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, बाबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष नाईक म्हणाले की, केंद्र सरकारने याअगोदर साखर दर ३२५० रुपये धरून एफआरपी काढली आणि आता दर २००० रुपयांपर्यंत आहेत. मग केंद्र शासनाने हा मधील फरक अनुदान म्हणून द्यावा. शासनाने कारखान्यांना १५ हजार कोटी दिले आहेत. ते अनुदान नसून कर्ज आहे. त्यामुळे ही कर्जफेड पुढील वर्षापासून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातूनच जाणार आहे. शासनाने कर्जाऐवजी अनुदान द्यावे.ते म्हणाले की, आज विश्वास कारखाना स्वनिधीतून आधुनिकीकरण, डिस्टिलरी प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी परवानगी मागत आहे. मात्र शासन त्याला परवानगी देत नाही. यामध्ये कारखानदारीबरोबर चाळीस हजार शेतकरी अडचणीत येणार आहेत. शासनाचे असेच धोरण राहिले तर, काळाची गरज ओळखून सभासदांचे हक्क अबाधित ठेवून कारखान्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. कोणताही निर्णय शेतकरी सभासदांच्या परवानगीनेच घेतला जाईल. गेल्या १५ वर्षांत १५१ कोटींची गुंतवणूक करून १२५० टन क्षमतेचा कारखाना चार हजार टन ऊस गाळप क्षमतेचा झाला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून २१ कोटींची वीज यावर्षी विकली जाणार आहे. हा प्रकल्प येत्या चार वर्षात कर्जमुक्त होईल.यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील, अमरसिंह नाईक, दिनकरराव पाटील, रणजितसिंह नाईक, विराज नाईक, विलासराव पाटील, युवराज गायकवाड, विश्वास कदम, भीमराव गायकवाड, राजेंद्रसिंह नाईक, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेशराव चव्हाण, संजय नाईक, अरुण साळुंखे, प्रमोद नाईक, दिनकर महिंद, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. संचालक विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांनी अहवाल वाचन केले. अभिमन्यू निकम, अशोक कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)इतर कारखान्यांच्या दराशी तुलनायावेळी माजी संचालक पी. के. पाटील यांनी इतर कारखाने किती जादा देतात, असा प्रश्न उपस्थित केला. यास उत्तर देताना अध्यक्ष नाईक यांनी, शिवाजी केनने पहिल्यांदा दोन हजार, नंतर एक हजार दर दिला. उदय कारखान्याने पहिले दोन महिने २४०० रुपये दिले. नंतर किती दर दिला, रयतने किती पैसे दिले, ते संबंधित ऊस घालणाऱ्यांना विचारा म्हणजे समजेल. आपण सर्व उत्पादकांना एकच दर शेवटपर्यंत दिला आहे. आॅक्टोबरमध्ये ३१६ रुपयांचा हप्ता वर्ग करणार आहे. त्यामुळे २४१६ रुपये दर विश्वास कारखाना देणार आहे.यावेळी डॉ. निवृत्त महिंद यांनी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना खासगी करावा, असा ठराव मांडला. त्यास बळवंत पाटील यांनी अनुमोदन दिले.
...अन्यथा विश्वास कारखान्याचे खासगीकरण
By admin | Updated: September 22, 2015 23:50 IST