सांगली : डिसेंबर व फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, तासगाव, आष्टा, पलूस नगरपालिका आणि खानापूर, कडेगाव आणि कवठेमहांकाळ नगरपंचायतींची रणधुमाळी आता रंगणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात २३ ऑगस्टपासून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिसेंबर व फेब्रुवारीपर्यंत मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. ठरलेल्या मुदतीत निवडणुका घेणे आवश्यक असल्याने प्रभाग रचना वेळेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे सदस्यसंख्या निश्चित करून प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नगरपालिका, नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेच्या आराखडयाबाबत सूचना आल्याने आता या शहरातील निवडणुकींची रणधुमाळी रंगणार आहे.