पुनवत :
प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्ताने ६ ते १४ वर्षे वयोगटातील दाखलपात्र विद्यार्थी निश्चित करण्यासाठी शिराळा तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा पालक, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यासमवेत ऑनलाइन बैठक घेणार आहेत. ५ ते १० एप्रिलदरम्यान हा नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्याचे शिक्षण विभागाने सूचित केले आहे.
सर्व प्राथमिक शाळा प्रतिवर्षी गुढीपाडव्याला आपापल्या शाळेतील नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे निश्चित करतात. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या गावातील एकही विद्यार्थी परगावी शिक्षणास जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक प्राथमिक शाळेने घेण्याचे शिक्षण विभागाने सूचित केले आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा पालकांची ऑनलाइन बैठक घेऊन विद्यार्थी प्रवेश निश्चित करणार आहेत. यानिमित्ताने पालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. या ऑनलाइन बैठकीला पालकांबरोबरच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सरपंच, सर्व सदस्य तसेच त्या त्या विभागातील पंचायत समिती सदस्य व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित राहणार असून, या माध्यमातून प्राथमिक शाळांचा पट वाढण्यास मदत होणार आहे.