सांगली : मिरज शहराच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे चौकांची चित्रविचित्र नावे. येथे बोकड चौकापासून जिलेबी चौकापर्यंत हरेक तऱ्हेचे चौक पाहायला मिळतात. लोकांच्या दैनंदिन व्यवहारातील ही नावे आता महापालिकेच्या दफ्तरीही अधिकृतरित्या नोंदली गेली आहेत.
मिरजेच्या मंगल कार्यालयांतील चविष्ट जेवणावळींमुळे कधीकाळी अवघ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी सुटायचे. ब्राह्मणपुरीतील अर्धा डझन मंगल कार्यालयात वर्षभर कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिलेबीचा घमघमाट सुटलेला असायचा. यावरुनच मंगल कार्यालये सुरू होणाऱ्या भागाला चक्क ‘जिलेबी चौक’ असेच नाव पडले.
यशवंत बँकेशेजारचा परिसर म्हणजे ‘बोकड चौक’. वास्तविक यशवंत बँकेने आपल्या देदिप्यमान कारकिर्दीतून हजारो मिरजकरांची घरे उभारली. पण, हा चौक बँकेच्या नावे न ओळखता मटण दुकानांच्या गर्दीमुळे चक्क बोकड चौक नावाने प्रसिद्ध झाला. कालांतराने त्याचे नामकरण ‘अमन चौक’ झाले असले तरी ‘बोकड चौक’ नावच प्रसिद्ध आहे.
शहराच्या सांस्कृतिक वाटचालीचा इतिहास या चौकांच्या नावांतून प्रतीत होतो. मिरजेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांची स्मृती जपण्यासाठी वेगवेगळ्या चौकांना प्रभृतींची नावे देण्यात आली. ‘पद्मश्री‘ मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या प्रा. बी. आर. देवधर यांच्यापासून संगीतरत्न अब्दुल करीम खाँसाहेबांपर्यंत सर्वांच्या स्मृती शहराने जपल्या आहेत.
बालगंधर्व समोरील चौक संगीताचार्य प्रा. पद्मश्री बी. आर. देवधर यांच्या स्मृती जपतो. संगीत दिग्दर्शन आणि स्वतंत्र धाटणीच्या गायकीत अद्वितीय कामगिरी करणार्या या कलावंताची तत्कालीन नगरपालिकेने अशा प्रकारे स्मृती चिरंतन ठेवली. मिरजेतील दुसरे पद्मश्री बहुमान प्राप्त स्वातंत्र्यसैनिक बी. बी. शिखरे मात्र अजूनही दुर्लक्षितच आहेत.
मोठ्या वर्दळीचा मुख्य चौक असलेल्या लक्ष्मी मार्केट परिसराला महाराणा प्रताप चौक नाव आहे. पण, आजही ‘श्रीकांत चौक’ ही त्याची ओळख पूर्णत: पुसली गेली नाही. वास्तविक हे नाव एका हॉटेलचे आहे. शिवाजी क्रीडांगणाजवळील राजर्षी शाहू महाराज चौकही ‘हिरा हॉटेल चौक’ नावानेच परिचित आहे. तळ्यावरील गणेश मंदिराचा परिसर म्हणजे गणेश पेठ, पण याचाही विसर पडला आहे. ब्राह्मणपुरीतील जामा मस्जिद आणि हरबण्णा पटवर्धन वाड्याचा परिसर म्हणजे शुक्रवार पेठ. एक नंबर शाळा परिसराचे खरे नाव रविवार पेठ. मुख्य बसस्थानक रस्ता म्हणजे संगीतरत्न अब्दुल करीम खाँ मार्ग. हा सारा ऐतिहासिक व सांस्कृतिक दस्तऐवज नावांसह जपण्याऐवजी चित्रविचित्र नावांमुळे विस्मृतीत जात आहे.