लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कऱ्हाडहून विट्याकडे येणारी दुचाकी रस्त्यावरच मध्यभागी पार्किंग केलेल्या ट्रकवर आदळून दुचाकीवरील नागेश अंकुश देवकुळे (वय ३८, रा. साठेनगर, तासगाव, सध्या रा. नेवरी रोड, विटा) जागीच ठार झाले. त्यांचा लहान मुलगा ओम नागेश देवकुळे (८) गंभीर जखमी झाला. हा अपघात दि. २७ मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास झाला.
याप्रकरणी ट्रकचालक विनायक नायकू शिरोळे (वय ४१, रा. काडापूर, ता. चिक्कोडी, कर्नाटक) यास अटक केली आहे.
मूळचे तासगाव येथील नागेश देवकुळे विटा न्यायालयात लिपिक होते. शनिवारी (दि. २७) सुट्टी असल्याने ते मुलगा ओम यास दुचाकीवरून (क्र. एमएच १०बीसी ९६५४) कऱ्हाडला घेऊन गेले होते. रात्री परत येत असताना विटा शहराजवळ रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या मध्यभागी ट्रक (क्र. केए २२ सी २३२८) उभा केला होता. त्या ट्रकच्या पाठीमागील बाजूस रिप्लेक्टर लावण्यात आले नव्हते.
त्यावेळी अंधारात ट्रक दिसला नसल्याने ट्रकच्या पाठीमागील उजव्या बाजूस दुचाकीची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक नागेश देवकुळे जागीच ठार झाले. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कर्नाटकचा ट्रकचालक विनायक शिरोळे यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पी.के. कण्हेरे करीत आहेत.