लोकमत न्यूज नेटवर्क
संख : सिद्धनाथ (ता. जत) येथील सिद्धाप्पा बसाप्पा पुजारी (४०) याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह विहिरीत तीन दिवसांनंतर सापडला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. शुक्रवारी सकाळी १० वाजता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
मयत सिद्धाप्पा बसाप्पा पुजारी शेळीपालन, शेतमजुरीचा व्यवसाय करतात. बुधवारी मजुरीचे काम करून शेळ्या चरण्यासाठी रानात घेऊन गेले होते. चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेळ्या सायंकाळी परत आल्या; परंतु ते परत आले नाहीत. घरातील लोकांना संशय आला.
घरच्यांनी आजूबाजूचा परिसर, विहीर याठिकाणी दोन दिवस शोध घेतला. पै-पाहुण्यांकडेही शोध घेतला असता ते सापडले नाहीत.
नातेवाइकांनी सिद्धाप्पा पुजारी हे बेपत्ता झाल्याची वर्दी जत पोलीस ठाण्याला दिली होती.
शुक्रवारी सकाळी १० वाजता सिद्धनाथ-कलमडी रस्त्यावरील महादेव माळी यांच्या विहिरीत सिद्धाप्पा पुजारी यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. सिद्धाप्पा पुजारी यांना पोहता येत नव्हते. पाणी पिण्यासाठी ते विहिरीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून ते पाण्यात पडले असावेत. त्यात त्यांचा बडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मृत सिद्धाप्पा पुजारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घटनास्थळी जत पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जत येथे पाठविण्यात आला. घटनेचा तपास पोलीस नाईक लक्ष्मण बंडगर करीत आहेत.