सांगली : महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारताच कर भरण्यासाठी व्यापारी सरसावले आहेत. गुरुवारी एका दिवसात पालिकेच्या तिजोरीत एक कोटी चार लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. दरम्यान, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कृती समितीने उद्या, शनिवारी रात्री व्यापाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिका प्रशासनाने एलबीटी वसुलीसाठी कठोर पाऊल उचलत, ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्याची कारवाई केली. या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती विक्रीकर विभागाकडून घेण्यात आली होती. पालिकेचे पत्र मिळताच बहुतांश बँकांनी व्यापाऱ्यांच्या खात्यावरील व्यवहार थांबविले आहेत, तर काही बँकांनी प्रक्रिया सुरू केली आहे. बँकांना खाती सीलची नोटीस दिल्यानंतर पालिकेने संबंधित व्यापाऱ्यांनाही नोटीस बजाविली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांचे सहा कोटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पालिकेने आणखी शंभर व्यापाऱ्यांची यादी तयार केली आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्ग कर भरण्यासाठी सरसावला आहे. काल, गुरुवारी एकाच दिवसात एक कोटी चार लाख रुपयांचे २५० धनादेश बँकेत जमा झाले. दरम्यान, एलबीटीविरोधी कृती समितीनेही कर न भरण्याचा पुनरुच्चार केला आहे. आयुक्तांनी बँक खाती गोठवून व्यापारी व अधिकाऱ्यांत भांडणे लावली आहेत. हा विषय चर्चेतून सुटणारा होता, पण कारवाई करून त्यांनी समन्वयाला काळीमा फासला आहे. व्यापाऱ्यांनी ग्राहकांना एलबीटी आकारलेला नाही. त्यामुळे तो कर भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यापुढे व्यापारी प्रशासनाशी चर्चा करणार नसून कारवाई करण्यास लावणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. आयुक्त नोटिसा मागे घेत नाहीत, तोपर्यंत चर्चा अथवा कर भरणार नसल्याचे स्पष्ट करून, याबाबत उद्या, शनिवारी पाटीदार भवन येथे व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केल्याची माहिती समितीचे समीर शहा यांनी दिली. (प्रतिनिधी)
एका दिवसात एलबीटीची एक कोटीची वसुली !
By admin | Updated: August 23, 2014 00:06 IST