कोकरुड : मेणी (ता. शिराळा) येथील किराणा दुकानातील चोरीप्रकरणी रोशन जयसिंग तोळसनकर (वय १९ रा. रांजनवाडी ता. शिराळा ) याला कोकरुड पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेणी येथील बाबूराव नारायण पाटील यांचे गुढे-पाचगणी मार्गावर रांजनवाडी येथे निनाई किराणा मालाचे दुकान आहे. ३० जानेवारी रोजी पाटील यांनी रोजच्याप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करुन मेणी येथील घरी गेले. दुकानात कुणीही राहत नसल्याची माहिती संशयित आरोपी रोशन तोळसनकर यास असल्याने त्याने दुकानाच्या छतावरील कौले काढून आत प्रवेश केला. ड्रॉवरमधील रोख तीस हजार रुपये चोरी केले. ३१ जानेवारी रोजी बाबूराव पाटील यांनी दुकान उघल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला.
याबाबत त्यांनी कोकरुड पोलिसात तक्रार दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित म्हणून रोशन यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. बाबूराव पाटील यांची यापूर्वी दुकान फोडून चार वेळा चोरी झाली होती.