सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य संशयित मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. रवी हरी चंडाळे (वय ३६, रा. शिवाजी मंडई) असे संशयिताचे नाव आहे. अटकेची प्रक्रिया रात्री उशिरा पूर्ण करण्यात आल्याचे पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत मोहिद्दीन मुल्ला हा वारणानगर येथील ९ कोटी १८ लाख रुपयांच्या चोरीतील मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी १२ मार्च २०१६ मध्ये त्याच्या घरावर छापा मारून ३ कोटींची रोकड जप्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी १५ मार्च २०१६ पर्यंत तपासासाठी वारणानगर येथे छापे मारले. या छाप्यावेळी त्यांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. एकूण ९ कोटी १८ लाख रुपयांवर पोलिसांसह मुल्ला याने डल्ला मारला, अशी फिर्याद सरनोबत यांनी दिली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरळपकर आणि मोहिद्दीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
मोहिद्दीन मुल्ला हा वर्षानंतर जामिनावर सुटला होता. तो विजयनगर येथे एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत जुगार क्लब चालवण्याचा प्रयत्न केला; परंतु विशेष पोलीस पथकाने छापा टाकून त्याच्यावर कारवाई केली. या कारवाईनंतर मुल्ला हा क्लब चालवण्यासाठी सांगली शहरात जागा शोधत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलजवळील गणेशनगर, रमामातानगर परिसरात तो जागा शोधत होता. यात त्याचा संशयित हल्लेखोरांशी आर्थिक कारणातून वाद झाला होता. या वादातूनच त्याचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी रवी चंडाळे या संशयितावर रविवारी रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने अटकेची कारवाई केली. अन्य संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.