सांगली : नामवंत कंपनीच्या टायरची डीलरशीप मिळवून देतो, म्हणून माधवनगर येथील व्यापाऱ्यास एकाने एक लाख ४५ हजार ८०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अशोक सूर्यकांत शर्मा (रा. मंगळवार पेठ, माधवनगर) यांनी प्रशांत अग्रवाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवनगर येथील शेतकरी अवजारांचे व्यापारी असलेल्या शर्मा यांना संशियताने संपर्क साधून टायरची डीलरशीप मिळवून देतो असे सांगितले होते. ई-मेलद्वारे संवाद झाल्यानंतर पुन्हा मोबाईलवरही चर्चा करून डीलरशीप देतो, त्याची अनामत रक्कम म्हणून रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यानुसार शर्मा यांनी एक लाख ४५ हजार ८०० रुपये बॅंक खात्यावर भरले हाेते. त्यानंतर संशयितांशी वारंवार संपर्क साधूनही टायरची डीलरशीप मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शर्मा यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.