सांगली : आयुष्याच्या मावळतीला शासनाच्या मानधनावर भरोसा ठेवून जगणाऱ्या जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे नोव्हेंबरपासूनचे मानधन थकीत असल्याने त्यांची परवड होत आहे. कला, साहित्यातून समाजाची सेवा केल्यानंतर आता शासनाच्या दिरंगाईच्या कला त्यांना पाहाव्या लागत आहेत.
जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांची संख्या २ हजार ३८७ इतकी आहे. औषध व इतर खर्चाची तजवीज हे कलाकार याच तुटपुंज्या मानधनातून करतात. हे मानधन वेळेत न मिळण्याची तक्रार जुनीच असली तरी आता विलंबाचा कालावधी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांची परवड सरु झाली आहे. मानधनाच्या भरोशावर उधार, उसनवाऱ्या करुन त्यांची जगण्याची धडपड सुरु आहे.
चौकट
मानधन मिळणारे कलाकार, साहित्यिक
राष्ट्रीय स्तरावरील १७
राज्य स्तरावरील ११५
जिल्हा स्तरावरील २,२५५
कोट
शासनाने वेळेत दरमहा मानधन द्यायला हवे. बहुतांश कलाकारांना या मानधनाची प्रतीक्षा करावी लागते. राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांना ५ हजार, राज्य स्तरावरील कलाकारांना ३ हजार व जिल्हा स्तरावरील कलाकारांना २ हजार रुपये मानधन असायला हवे, पण आताचे मानधन तुटपुंजे आहे.
बजरंग आंबी, सांगली
कोट
शासनाकडून मानधन मिळत आहे. वेळेत नसले तरी दोन-तीन महिन्यांनी मोठी रक्कम मिळते. आमची अपेक्षा केवळ मानधन वाढावे इतकीच आहे. त्यावर बरेच खर्च आम्हाला करावे लागतात.
मोहन यादव, सांगली
कोट
मी अपंग आहे. महागाईमुळे उदरनिर्वाह करणे मुश्कील आहे. जमीन, जुमला नसल्याने केवळ मानधनावर माझी मदार असल्याने शासनाने वेळेत व वाढीव मानधन द्यावे, ही अपेक्षा आहे.
नबीलाल पेेंटर, भाळवणी
कोट
जिल्ह्यातील कलावंत, साहित्यिकांचे प्रस्ताव नव्याने येत आहेत. तसेच प्रस्ताव मंजूर असलेल्या कलाकारांना संचालनालयाकडून मानधन दिले जाते. आम्ही नव्या प्रस्तावांची छाननी करुन रितसर हे प्रस्ताव समितीच्या मान्यतेने शासनाकडे पाठवत असतो.
संभाजी पवार, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली