सांगली : येथील चारचाकी वाहनांचे जुने बाजार सध्या तेजीत आहे. नवीन कार खरेदी करण्याची ऐपत नसणाऱ्यांना याठिकणाी मोठी सोय होत आहे. यापूर्वी रविवारी एकदा भरणारा बाजार आता नियमित झाला आहे. आठवड्याला सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची याठिकणी उलाढाल होत आहे. सांगलीमध्ये जुन्या वाहनांचा बाजार अकरा ठिकाणी भरत आहे. यामध्ये कोल्हापूर रस्त्यावर पाच, तर सिव्हिल रोडवर एक व राममंदिर चौकात एक, तर माधवनगर रस्त्यावर एक, जुना बुधगाव रस्ता आदी ठिकाणी जुन्या वाहनांचा विक्रीचा व्यवसाय भरत आहे. एका कारच्या विक्रीमागे बाजार चालकांना पाच हजाराचे कमिशन मिळते. यामध्ये खरेदीदाराला अडीच हजार, तर विक्रेत्याला अडीच हजार रुपये द्यावे लागतात. यामध्ये करार करुन चारचाकींचा व्यवहार पूर्ण करण्यात येतो.गेल्या चार, पाच वर्षात याठिकाणच्या बाजाराला चांगलीच तेजी आली आहे. सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर व कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून खरेदीदार व विक्रेते याठिकाणी येतात. अगदी ५० हजाराच्या चारचाकीपासून वीस लाखांपर्यंत चारचाकींची खरेदी-विक्री याठिकणी होते. त्याचबरोबर अगदी नव्या वाहनांसह दहा वर्षापर्यंतच्या वाहनांचाही याठिकणाी बाजार भरतो. वाहन विक्रेते याठिकाणी कार लावून जातात. ज्यावेळी ग्राहकांना त्यांचे वाहन पसंत पडते त्यावेळी जुन्या बाजाराचे संयोजक वाहन मालकाला बोलावून घेतात. त्यानंतर चर्चेनंतर व्यवहार ठरतो. कधी कधी वाहनांची किंमत संयोजकांना सांगून मालक जातात. त्यामध्ये संयोजकच व्यवहार करतात. (प्रतिनिधी)वाहन बुकिंगही सुरु जुन्या बाजारात आपल्याला हवे असलेले वाहन व मॉडेल ग्राहक बुक करुन जातात. तशा प्रकारचे वाहन बाजारात आल्यानंतर जुने बाजार चालक ग्राहकांना बोलावून आलेले वाहन दाखवतात. काही ठिकाणी जुने वाहन बाजारचालकच खरेदी करतात. ज्यावेळी त्याला मागणी होते, तेव्हा ते वाहन विकतात. दिवाळी, दसऱ्यामध्ये या ठिकाणचा बाजार जोमात असतो. नवी कार खरेदी न करू शकणाऱ्यांना हा जुना बाजार सोयीचा झाला आहे. गेल्या चार , पाच वर्षांत येथील बाजारही तेजीत आला आहे. पूर्वी रविवारी एकदा बाजार भरत होता, आता रोजचाच याठिकणाी बाजार आहे.- मिलिंद पाटील, संचालक, चारचाकी जुना वाहन बाजार
सांगलीत चारचाकी वाहनांचा जुना बाजार तेजीत
By admin | Updated: November 9, 2014 23:32 IST