सांगली : मिरजेतील गॅस्ट्रोच्या साथीबद्दल महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत खासदार संजय पाटील यांनी महापालिका कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. जुन्या, जीर्ण झालेल्या पाईपलाईन बदलण्याबरोबरच साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे, अशा सूचना खासदार संजय पाटील यांनी दिल्या. संजय पाटील यांनी आज अचानक महापालिका आयुक्तांना दूरध्वनीवरून बैठकीचा निरोप दिला. त्यामुळे सकाळपासून महापालिकेत अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू होती. दुपारी बारा वाजता आढावा बैठक सुरू झाली. संजय पाटील म्हणाले की, गेल्या दीड महिन्यापासून नागरिक दूषित पाण्याबद्दल तक्रार करीत असताना महापालिका अधिकाऱ्यांनी कोणत्याच उपाययोजना का केल्या नाहीत. इतके दिवस या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिरजेतील ड्रेनेजची योजना ही १९६९ ची, तर पाणीपुरवठा योजना १९५० ची असल्याने पाईपलाईन जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळेच पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागून दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणच्या काही पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे. काही कामांसाठी पैशाची गरज आहे. तातडीने उपाययोजना सुरू आहेत. निश्चितपणे त्यात यश येईल. केंद्र व राज्य शासनाकडून काही निधी लागत असेल तर, त्याबाबत आपण पाठपुरावा करू, पण तातडीच्या उपाययोजना महापालिकेने केल्या पाहिजेत, असे पाटील यांनी सांगितले. बैठकीत उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रशांत रसाळे, सहाय्यक आयुक्त, प्रभारी आरोग्य अधिकारी चारुदत्त शहा, डॉ. रोहिणी कुलकर्णी तसेच भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खासदारांकडून अधिकारी फै लावर
By admin | Updated: November 23, 2014 23:57 IST