इगतपुरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत इगतपुरी नगर परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, पदाधिकारी यांनी विविध भागांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी गांधी चौक, भाजीमंडई, कोकणी मोहल्ला, लोया रोड, आनंदनगर आदि भागांची पाहणी करण्यात आली. यावेळी कुशवाह यांनी नगरपालिका प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.तसेच मोठ्या नाल्यामधील घाणीचे साम्राज्य पाहून जेसीबीद्वारे साफसफाईचे आदेश देण्यात आले. रेल्वे हद्दीतील केरकचरा नगरपालिकेच्या रस्त्यावर टाकता कामा नये, असा आदेश रेल्वे सफाई ठेकेदारास देण्यात आला.दरम्यान, यंदा प्रथमच जिल्हाधिकारी यांनी स्वच्छतेबाबत थेट पाहणी केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तर गटनेते फिरोज पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रभागाच्या समस्या बघा, असे साकडे घालून प्रभाग दाखविला. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकारी यांनी जाणून घेऊन त्यावर नगरपालिका प्रशासनाला त्वरित उपाययोजनेचे आदेश दिले.यावेळी मुख्याधिकारी डॉ. मटांडा राजा दयानिधी, प्रभारी नगराध्यक्ष रत्नमाला जाधव, विरोधी गटनेते फिरोज पठाण, माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, नगरसेवक यशवंत दळवी, लेखापाल मिलिंद रणधीर, आरोग्य अधिकारी विवेकानंद केदारे, रफिक शेख, कर निरीक्षक अनिल पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांची कानउघडणी
By admin | Updated: January 7, 2016 23:29 IST