सांगली : कुपवाड शहराला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत गुरुवारी स्थायी समिती सभेत नगरसेवक शेडजी मोहिते यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. सभापती संजय मेंढे यांनी, जादा पाणी उपसा करून तीन शहरांतील नागरिकांना पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सभापती मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. या सभेत नगरसेवक मोहिते यांनी कुपवाडमधील पाण्याचा प्रश्न मांडला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कुपवाडला पाणीच आलेले नाही. केवळ अर्धा तास पाणी दिले जात आहे. जनतेत तीव्र असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले. सभापतींनी पाणीपुरवठा अभियंत्यांना विचारणा केली. नदीतून पाण्याचा उपसा कमी होत असल्याने पाणीटंचाईचे सावट आहे. त्यासाठी एक तास जादा विद्युत मोटारी चालवून पाणी उपसा करण्याचे आदेश दिले. मोहिते यांनी, पाणी कनेक्शनसाठी प्लंबरच्या सही, शिक्क्याची अट घातल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड बसणार असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर मेंढे यांनी ही अट रद्द करण्याचे आदेश दिले. महापालिका व शासकीय निधीतील अनेक कामे अद्याप सुरू झालेले नाहीत. पालिकेचे १५ ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. त्यांना अंतिम नोटिसा बजावून तातडीने काळ्या यादीत टाकण्याची मागणी मोहिते यांनी केली. महापालिकेच्या २२ सफाई कामगारांपैकी १३ जणांचे पगार दिले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने देण्याचे आदेश मेंढे यांनी दिले. प्रशासनाने ५७ कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. त्याचा परिणाम कचरा उठाव, स्वच्छतेवर होत आहे. या कर्मचाऱ्यांनी केवळ मुलाखती दिल्या नाहीत, म्हणून त्यांना कामावरून कमी करणे अयोग्य ठरेल. प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवून मुलाखतीद्वारे या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची सूचनाही सभेत करण्यात आली. मिरजेत रस्त्यासाठी मनसेच्यावतीने सुरू असलेल्या उपोषणाची दखलही सभेत घेण्यात आली. मिरज-पंढरपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून कामाला सुरूवात केली जाईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कुपवाडच्या पाण्यावरून अधिकारी धारेवर
By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST