जत : जत शहर हे अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार लोकसंख्येचे असून नियमितपणे औषध, धूर फवारणी न होणे व दूषित पिण्याच्या पाण्यामुळे शहरात सर्वत्र हिवताप, टायफाइड, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांत वाढ झाली आहे.
गावात सर्वत्र डासांची भुणभुणही वाढली आहे. अगदी डोळ्यांसमोर अनेक डास सहजपणे फिरताना दिसत असून, नजर चुकवून देखील चावा घेत आहेत. या डासांमुळे नागरिक हैराण झाले असून, संतापाची लाट पसरली आहे. नियमितपणे धूर व औषध फवारणी केली जात नसल्यानेच ही वेळ ग्रामस्थांवर आल्याचे दिसून येत आहे. शहराच्या हद्दीत व गावठाण भागात सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणा सक्षम नाही. उघड्या गटारांची समस्या कायम असल्याने येथे नेहमी घाणीचे साम्राज्य आहे. सुका आणि ओला कचरा वर्गीकरण ही संकल्पना गावठाण भागात योग्यरीत्या वापरली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव नेहमीच असतो. मात्र, काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डासांची संख्या वाढली आहे. यामुळे खाजगी रुग्णालयात तापेच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.