मिरज : पुस्तक आणण्यासाठी वाचनालयात जाणे त्रासदायक ठरत असल्यास ते स्वत:च तुमच्या दारात येणार आहे. मिरजेत मिरज विद्यार्थी संघाच्या खरे मंदिर वाचनालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.
१५ ऑक्टोबर या वाचन प्रेरणा दिवसापासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल. वाचनालयाचे अनेक सभासद वयोवृद्ध आहेत. काही सभासद दूर अंतरावर राहतात. वेळेअभावी प्रत्यक्ष वाचनालयात येणे त्यांना शक्य होत नाही. अनेक महिलांना पुस्तक वाचनाची आवड आहे; पण वाचनालयात जाणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन खरे मंदिर वाचनालयाने वाचनालयाने तुमच्या दारी उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत वाचनालयातील सुमारे दहा हजार पुस्तकांची यादी वाचकांना दिली जाईल. त्यातून निवडलेल्या पुस्तकाचे नाव संस्थेला कळवायचे आहे. ग्रंथालयाचा कर्मचारी आठवड्यातून एकदा घरी येऊन पुस्तक देऊन जाईल. या सेवेसाठी नाममात्र शुल्क घेतले जाणार आहे.