सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीला सहकार विभागाच्या सचिवांनी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे कारखाना कॉलनीतील दोनशे घरे पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील कामगारांना घरे खाली करण्याच्या नोटिसा कारखाना प्रशासनाने दिल्या आहेत. नियमित पाचशे कामगारांची कारखान्याच्या अन्य कॉलनीत सोय केली आहे. सेवानिवृत्त तीस कुटुंबियांची मात्र पर्यायी व्यवस्था केली जाणार नसल्याचे दिसत आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतरही कॉलनीत राहणाऱ्या तीस कुटुंबियांचा संसार रस्त्यावर येण्याची शक्यता असल्यामुळे, त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची छाया दिसत आहे. दरम्यान, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, थकित पगाराची रक्कम दिल्याशिवाय कॉलनीतील एकही कामगार घर सोडणार नसल्याचा पवित्रा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.कारखान्यातील चौदाशे कामगारांना २००२ पासूनची ग्रॅच्युईटी १४ कोटी, फंडाची रक्कम साडेसात कोटी, थकित पगाराचे १८ कोटी रुपये मळालेले नाहीत. चौदाशेपैकी साडेतीनशे कामगार मृत झाले आहेत. तरीही कामगारांना न्याय मिळालेला नाही. थकित रक्कम न मिळाल्यामुळे सेवानिवृत्तीनंतरही तीस कुटुंबे कारखान्याच्या कॉलनीत राहात आहेत. या कामगारांनी जायचे कुठे? कारखान्याने थकित रक्कम दिल्यास कामगार कॉलनीतील घरे सोडण्यास तयार आहेत. परंतु, त्यापूर्वीच कारखान्याच्या प्रशासनाने जागा विक्रीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. कारखान्याच्या विक्री करण्यात येणाऱ्या २१ एकर जागेत कामगारांची कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये दोनशे कुटुंबीय रहात असून, यामध्ये तीस सेवानिवृत्त कामगारांचे कुटुंबीय रहात आहेत. जागा विक्रीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठी घरे खाली करण्याच्या नोटिसा सेवानिवृत्त कामगारांना दिल्या आहेत. कारखाना सेवेतील नियमित कामगारांना मात्र अन्य कॉलनीत स्थलांतराच्या तोंडीच सूचना दिल्या आहेत. प्रशासनाच्या निर्णयामुळे कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
वसंतदादा कारखान्याच्या कामगारांना नोटिसा
By admin | Updated: August 13, 2014 23:34 IST