मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील बसस्थानक परिसरात अनधिकृत खोकी चोवीस तासात काढावीत, अशा नोटीसा खोकीधारकांच्या खोक्यावर चिकटवण्यात आल्या. तहसीलदार गणेश शिंदे, तलाठी सुभाष बागडी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
तहसीलदार गणेश शिंदे यांनी सलग दुसऱ्या दिवशी धडक मोहीम राबवून अनधिकृत खोकीधारकांना जरब बसविली आहे.
बसस्थानक परिसरातील नोटीस चिकटवलेली खोकी संबधितांनी २४ तासांच्या आत काढून न घेतल्यास शासकीय यंत्रणेमार्फत खोकी काढून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
बुधवारपासून तहसीलदार शिंदे यांनी मांगले येथील बसस्थानक परिसरात शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणाचा विषय गांभीर्याने घेतला असून टप्प्याटप्प्याने बसस्थानक परिसर अतिक्रमणमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या परिसरात पानपट्टी, बेकरी, हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा अवैध व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोकी घातल्याचे निदर्शनात आल्यामुळे तहसीलदार शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर या परिसरातील ज्या व्यावसायिकांकडे वीज मीटर आहे त्यांनी इतर खोक्यात दिलेल्या वीज पुरवठ्यासंदर्भात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन अशी वीज दिलेल्या वीज ग्राहकाचा तत्काळ वीजपुरवठा खंडित करावा असे आदेश दिले.
तलाठी सुभाष बागडी यांनी नोटीस दिलेल्या खोकीधारकांना कारवाई होण्याअगोदर खोकी काढून घ्यावीत असे आवाहन केले.