लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दोन दिवसांपूर्वी सर्वच विभागांना अचानक भेट दिली. यावेळी १९ कर्मचारी कामावर उशिरा आल्याचे आढळून आले होते. या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून त्यांच्यावर वेतनकपातीची टांगती तलवार आहे.
महापालिकेचे अनेक कर्मचारी ऑनड्युटी भटकंती करीत असतात. काहीजण सकाळी वेळेवरही हजर होत नाही. याबाबतच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी आयुक्त कापडणीस यांनी मुख्यालय, शाळा क्रमांक -१ जवळील इमारतीतील कार्यालयांना अचानक भेट देऊन पाहणी केली. कार्यालयीन वेळ सुरू होऊनही काही कर्मचारी कामावर हजर झालेले नव्हते. अशा १९ कर्मचाऱ्यांवर आयुक्त कापडणीस यांच्या आदेशाने कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये लेट कमर्स कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे वेतन कपात का करू नये, अशी नोटीस बजाविली आहे. यामध्ये नगररचना, विद्युत विभाग, बांधकाम आणि राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
चौकट
कचरावेचक महिलांना सुरक्षा जॅकेट
महापालिकेच्या कचरावेचक १०० महिलांना आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाकडून सुरक्षा जॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, युनूस बारगीर उपस्थित होते.
फोटो ओळी :- महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, शाखा अभियंता वैभव वाघमारे उपस्थित होते. (छाया : नंदकिशोर वाघमारे)