रत्नागिरी : व्दितीय वर्ष पदवीच्या वर्गात ठाणे येथे शिकत असलेला नवेद पुस्तके आणण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, तो पुस्तके घेऊन घरी परतलाच नाही. वडील तीन दिवस शोध घेत होते. अखेर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवेदचे पार्थिव वडिलांना घरी आणावे लागले.नेवरे येथील लियाकत इब्राहिम नाकाडे व सबिहा लियाकत नाकाडे यांना दोन अपत्ये. मोठी मुलगी विवाहित असून, धाकटा मुलगा नवेद याच्या शिक्षणासाठी लियाकत नाकाडे सध्या मुंब्रा (मुंबई) येथे वास्तव्यासाठी होते. दहावीपर्यंतचे शिक्षण येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये पूर्ण झाले. नंतर नवेदने पदविका अभ्यासक्रम सावर्डे येथे पूर्ण केला. पदविका केल्यानंतर नवेदने नोकरीसाठी स्पष्ट नकार देत पुढील पदवीसाठी ठाणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सन २०१४ - १५चे पहिले वर्ष तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. सोमवारपासून दि. १९ पासून दुसऱ्या वर्षाची परीक्षा असल्याने अभ्यासाची पुस्तके आणण्यासाठी तो आईला सांगून शुक्रवारी सायंकाळी घराबाहेर पडला. पुस्तके खरेदी करून घरी परतण्यासाठी तो ठाणे रेल्वे स्थानकात आला. आईला मोबाईलव्दारे याची कल्पनाही दिली. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळचं होतं.ठाणे स्थानकात प्रवाशांनी तुडुंब भरून आलेल्या रेल्वेत नवेद शिरला. मात्र, कळवा स्थानकाच्या पुढे बोगद्यात नवेदचा हात अचानक निसटला व तो दरवाजातून बाहेर फेकला गेला. जोरात बाहेर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला फटका बसल्याने तो रक्तबंबाळ झाला. बराचवेळ झाला तरी मुलगा घरी न आल्याने आई - वडील चिंतेत पडले. फोनदेखील लागेनासा झाल्याने नेमके काय करावे, हे त्यांना सुचेना. पोलीस स्थानकात गेले असता, तेथेही २४ तास तरी होऊ द्या, नंतर तक्रार नोंदवा, असा सल्ला देण्यात आला. वडील आपल्या परीने शोध घेत असतानाच रविवारी मित्र, नातेवाईकांसोबत ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात गेले. तेथे कोणी अनोळखी व्यक्ती उपचारासाठी आली आहे का? असे विचारले. मात्र, असे कोणी दाखल नसल्याचे सांगण्यात आले. मनात शंकेचे काहूर थैमान घालत असतानाच त्यांनी शासकीय रूग्णालयातील शवागरात चौकशी केली. फोटो आणला आहे का? असे विचारताच वडिलांनी खिशातील फोटो काढून दाखवताच तेथील मंडळींनी मृतदेहाची ओळख पटवून घेण्यास सांगितले. सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करत सायंकाळी ताब्यात घेतलेला मुलाचा मृतदेह घेऊन वडील घरी परतले. नेवरे येथे सोमवारी नवेदचा दफनविधी पार पडला.अभ्यासात हुशार व अभियंता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या नवेदला नियतीने मात्र हरवले. लाडक्या मुलाच्या अपघाती मृत्यूचा धक्का आई, वडील, बहिणीला बसला आहे. शोकाकूल वातावरणात त्याला सर्वांनी निरोप दिला असला तरी आई मात्र, आपला मुलगा कधीतरी पुन्हा परतून येईल, याकडे डोळे लावून बसली आहे. (प्रतिनिधी)हुशार आणि जबरदस्त चिकाटी असलेल्या नवेद नाकाडे याचा असा मृत्यू व्हावा, या कल्पनेने नाकाडे कुटुंबिय हादरले आहेत. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच आणि तरुण वयातच झालेल्या निधनाने नेवरे गावावर शोककळा पसरली आहे.
पुस्तके आणण्यास गेलेला नवेद परतलाच नाही
By admin | Updated: October 21, 2015 23:39 IST