सांगली : शहरातील विश्रामबाग येथे कामावरून काढून टाकल्याच्या रागातून ड्रील मशीनच्या खोक्याने मारहाण करत एकाचे नाक फोडण्यात आले. याप्रकरणी नवनाथ नारायण बोराडे (वय २९, रा. विकासनगर, बामणोली) यांनी अभिषेक सातपुते (२१) व अक्षय महाजन (२४, दोघेही रा. इनामधामणी, ता. मिरज) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
बुधवार, दि. २५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी नवनाथ बोराडे व त्यांचे मित्र हर्षल जवळेकर, कंपनीतील सुपरवायझर सोमेश सदलगे, वरुण देशमुख हे चौघे बिरनाळे कॉलेजसमोर चहा पीत उभे होते. यावेळी संशयित तिथे आले व यांनी बोराडे यांना धक्काबुक्की करत ‘तूच माझ्याबद्दल कंपनीच्या मालकांना काहीतरी सांगितले. त्यामुळे मालकांनी मला कामावरुन काढले आहे’, असे म्हणत हातातील प्लॅस्टीकच्या ड्रील मशीनच्या जाड खोक्याने कपाळावर व नाकावर जोरात मारले. यात बोरोडे यांच्या नाकाचे हाड मोडले. नाकाच्या आतील बाजूस गंभीर जखम झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.