मिरज : गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना चाकूचा धाक व मारहाण करून चोरट्यांनी सुमारे एक लाखाचा ऐवज लुटला. याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना साताराजवळील सालपा स्थानकजवळ घडली.गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेस गुरुवारी रात्री सातारा स्थानकाजवळ आल्यानंतर सात ते आठ दरोडेखोर सर्वसाधारण डब्यात बसले. एक्स्प्रेस पुण्याच्या दिशेने निघाल्यानंतर चोरट्यांनी डब्यातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यास सुरुवात केली. तहसीलदार हरिहर यादव (रा. चौबे, उत्तर प्रदेश) या प्रवाशाकडून ५० हजार रुपये, श्रीपाल गजानन रजपूत (रा. ललितपूर, उत्तरप्रदेश ) याच्याकडून १५ हजार, सोनू रजपूतकडून १० हजार, राहुल आदिवासी (रा. अशोकनगर, मध्यप्रदेश) कडून ७ हजार रुपये, संजय रस्तोगी (रा. ललितपूर, उत्तर प्रदेश) यांच्याकडून १२ हजार व अन्य दोघाकडून असा १ लाखांचा ऐवज लुटण्यात आला. सर्वसाधारण डब्यात प्रवाशांची गर्दी असताना चोरट्यांनी केवळ हिंदी भाषिक व परप्रांतीय प्रवाशांना लक्ष्य केले. उत्तर भारतीय प्रवाशांना मारहाण करून लुटण्यात आले. सुमारे २५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. सालपा रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस थांबल्यानंतर चोरटे पसार झाले. लुटल्या गेलेल्या प्रवाशांनी पुणे स्थानकावर रेल्वे पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा मिरज रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. रेल्वे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक रमेश भिगारदे यांनी आज घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. चार दिवसांपूर्वी निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देवून लुटल्याची घटना ताजी असताना हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे.
‘निजामुद्दीन’वर दरोडा, लाखाचा ऐवज लुटला
By admin | Updated: November 22, 2014 00:08 IST