लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्य शासनाने लागू केलेल्या कोरोनाच्या नव्या निर्बंधांसह वीकेंडच्या लॉकडाऊनबाबत सांगली शहरातील व्यापारी पेठांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. मंगळवारपासून हे नवे निर्बंध अमलात येणार आहेत; मात्र शासन आदेशाबाबत व्यापारी, व्यावसायिकांत संभ्रमावस्था दिसून आली. आदेश लागू होण्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
शासनाचे निर्बंध केवळ दोन दिवसांपुरतेच आहेत, असा समज व्यापारी, व्यावसायिकांनी केला होता, मात्र व्यापारी संघटनांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्यासाठी हे निर्बंध महिनाभर कायम राहणार असल्याचे समजले. त्यामुळे संघटनांनी सोशल मीडियाद्वारे ही बाब व्यापारी, व्यावसायिकांपर्यंत पोहोचवली. किरकोळ व्यावसायिकांना मात्र हा संदेश मिळाला नसल्याने त्यांना आठवड्यातील पाच दिवस व्यवसाय करण्यास मुभा आहे, असाच त्यांचा समज झाला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण सांगलीत दिसून आले. व्यापारी वर्गातून शासनाच्या या निर्णयाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरणही निर्माण झाले आहे.
एकीकडे हा गोंधळ सुरू असताना बाजारात भाजी व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील शिवाजी मंडई, रिसाला रोड, जुनी भाजी मंडई परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली.
कोट
गेले वर्षभर आम्ही व्यापार नसल्याने आर्थिक संकटात सापडलो आहोत. त्यातच पुन्हा निर्बंध आणून आम्हाला संकटात टाकण्याचे काम शासनाने केले आहे. व्यापाऱ्यांचे जगणे यामुळे मुश्कील होईल.
- समीर खान, व्यापारी, मारुती रोड, सांगली
कोट
घरपट्टी, वीजबिल आम्हाला भरावेच लागले. आता महिनाभर व्यापार बंद ठेवून आम्ही जगणार कसे? दुकाने बंद राहिल्याने देणी थांबणार नाहीत. त्यामुळे शासनाने आठवड्यातील काही दिवसतरी व्यवसायास मुभा द्यायला हवी होती.
-फैय्याज मुल्ला, पानपट्टीचालक, सांगली
कोट
एका कुटुंबातील चौघांना कुठेही जायचे असेल तर त्यांनी शासनाच्या नव्या निर्बंधानुसार दोन रिक्षा करायच्या का? दोघांसाठी रिक्षा करणे कोणत्याही ग्राहकाला परवडत नाही. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या आमच्या पोटावर यामुळे पाय पडणार आहे.
- माणिक पाटील, रिक्षाचालक, सांगली
व्यापारी संघटना आक्रमक
व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, शासनाने अर्धवट आदेश काढले आहेत. त्यात स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश काढायला हवे होते. त्यामुळे जोपर्यंत स्पष्ट आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही व्यापार सुरू ठेवणार. शासनाने काही व्यावसायिकांना मुभा व काहींवर निर्बंध असे आदेश मागे घ्यावेत. व्यापारी अतुल शहा यांनीही दुकाने बंद न ठेवण्याचे आवाहन करीत शासन निर्णयास विरोध दर्शविला.