बुधगावात संस्थानकाळातील गावातील अंतर्गत जलवाहिन्या बदलणे व तीन वेगवेगळ्या क्षमतेचे जलकुंभ उभारणीच्या ४ कोटी ४८ लाख रुपये खर्चाच्या कामाला मार्च २०१४ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानंतर पुढच्या दोन वर्षांत हे काम पूर्णही झाले. मात्र, मुख्यत्वे जलवाहिनीच्या कामात खुदाईमध्ये सुमारे ७० लाख तसेच फिटिंग कामात २५ लाख ८८ हजार असा एकूण ९५ लाख ८८ हजारांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. याप्रकरणी शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील यांनी आंदोलने करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मिरजेच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या पाच सदस्यीय समितीने संपूर्ण कामाची चौकशी केली. या समितीने १ नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी अहवाल दिला होता. त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नव्हती.
गुडेवार यांनी ही फाईल मंगळवारी पुन्हा उघडून नव्याने चौकशी सुरू केली. सकाळी सुमारे साडेतीन तास याप्रकरणी वेळ दिला. प्रथम पद्माळे येथील उद्भवापासून पूर्ण योजनेच्या कामांची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. खुदाई कामातील गैरप्रकारासंबंधी गावात प्रत्येक वॉर्डात चार याप्रमाणे चोवीस ठिकाणांची पाहणी पुढील दोन दिवसांत करण्याात येणार आहे. तक्रारदारांसमवेत या ठिकाणांची त्यांनी निश्चिती केली.
चौकट
आरोपांना पुष्टीच !
यापूर्वी याप्रकरणी नेमलेल्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत सादर करण्यात आलेल्या तांत्रिक तपासणी अहवालात गावातील नमुना खड्ड्यांमधील मऊ जमिनीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपाला पुष्टीच मिळाली आहे. यामुळे गुडेवारांकडे याप्रकरणी पाठपुरावा सुरुच ठेवला आहे.
सरपंच सुरेश ओंकारे, उपसरपंच हणमंत कदम, माजी उपसभापती प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील उपस्थित होते.
चौकट
चहा लवकर आणा नाहीतर दप्तर तपासतो !
संपूर्ण गावातून दुचाकीवरून फिरल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायतीत थांबलेल्या गुडेवारांसाठी सरपंचांनी कोऱ्या चहाचे फर्मान सोडले. मात्र, बराच वेळ थांबूनही चहा न आल्याने बसल्या-बसल्याच त्यांनी सरपंचांवरच गुगली टाकली. ‘चहा लवकर आणा नाहीतर मी ग्रामपंचायतीचे दप्तर तपासायला घेतो. वेळ व्यर्थ घालविणे मला पसंत नसते’. गुडेवारांच्या या इशाऱ्याने उपस्थितांमध्धे हशा पिकला. तोपर्यंत चहाही आला.