छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मच्छीमारांसाठी शासन लवकरच चांगले धोरण जाहीर करणार आहे. यासाठी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्यासोबत व्यापक बैठक घेणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी दिली. सांगलीत मच्छीमारांना काहील वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
शासकीय अनुदानातून ७४ मच्छीमारांना काहिलींचे वाटप डॉ. कदम यांच्या हस्ते झाले. कॉंग्रेसनेत्या जयश्री पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, किशोर जामदार, नगरसेवक अभिजीत चव्हाण, मंगेश चव्हाण, मयूर पाटील आदी उपस्थित होते. डॉ. कदम म्हणाले, महापुरात मच्छीमारांनी शेकडो लोकांचे प्राण वाचविले. एनडीआरएफच्या पथकांना पाण्यातून रस्ता दाखविण्यासाठी पुढाकार घेतला. याकामी काही मच्छीमारांना प्राणही गमवावे लागले. त्यांची कामगिरी विसरण्यासारखी नाही. डाॅ. पतंगराव कदम ट्रस्टतर्फे आणखी २६ काहिली दिल्या जातील.
यावेळी उपायुक्त अभय देशपांडे, गुरुराज नाडगौडा यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला वित्त विभागाचे सहसंचालक वैभव राजेघाटगे, कोषागार अधिकारी सुशीलकुमार केंबळे, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, अरुण चौगुले आदी उपस्थित होते. संयोजन गणेश आपटे, मुकेश भोकरे, किरण भोई, किरण कांबळे, श्रीकांत कांबळे आदींनी केले.
चौकट
फालतू, फाजील हिंदुत्वामुळे शाकाहार
विशाल पाटील म्हणाले की, मच्छीमार जगायचा झाल्यास आपण मासे खाल्ले पाहिजेत, पण फालतू, फाजील हिंदुत्वामुळे शाकाहारावर भर दिला जातो. माशांमध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. याचा विचार व्हायला हवा. भोई समाजाचे कॉंग्रेेसवर प्रेम आहे. आजच्या कार्यक्रमाला काही भाजपवाल्यांना बोलावण्यासाठी दबाव असतानाही समाजाने फक्त कॉंग्रेसवाल्यांना बोलविले. डॉ. कदम यांनीही दररोजच्या जेवणात मिळतील तेव्हा मासे खात असल्याचा उल्लेख केला.
------