लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोरोनाग्रस्तांच्या उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिल्या.
येथील तहसील कार्यालयात त्यांनी आढावा घेतला. त्यात ते बोलत होते. प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यात गेल्यावर्षीपेक्षा रुग्णसंख्या कमी आहे. ती वाढणार नाही, किंबहुना कमी कशी करता येईल त्यासाठी लागणारे सर्व ते उपाय करावेत. या काळात कोणत्याही यंत्रणेने हलगर्जीपणा करू नये. कोरोना रुग्णांची हेळसांड अथवा उपचारात हयगय होणार नाही याची काळजी घ्यावी. नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत, विनामास्क फिरणार नाहीत याची काळजी पोलीस यंत्रणेने घ्यावी. थोडासा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो.
गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, कोकरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, शिराळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, उत्तम सावंत आदी उपस्थित होते.