जत : विजापूर- गुहागर राज्य मार्गावरून वाटमारी करण्यासाठी व घातक शस्त्रांची विक्री करण्यासाठी फिरत असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना जत पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे. तुकाराम सुभाष मोटे (वय २५) आणि वैभव बाजीराव मलमे (२२, दोघे रा. संजयनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बिरनाळ फाटा (ता. जत) येथे करण्यात आली.
याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उत्तम जाधव व पोलीस हवालदार प्रवीण पाटील, केरुबा चव्हाण व त्यांचे सहकारी महामार्गावरून रात्री गस्त घालत असताना मोटे व मलमे संशयितरीत्या निसर्ग ढाबा परिसरात दुचाकी मोटारसायकलवरून (एमएच- १० डीए- ५७९७) जात असल्याचे दिसून आले. त्यांना हात करून थांबण्यास सांगितले; परंतु ते न थांबता तसेच पुढे निघून गेल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे पाच धारदार लोखंडी कोयते व कुकरी प्लास्टिकच्या पोत्यात बांधलेली मिळून आली. मोटारसायकल व धारदार हत्यारासह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण पाटील करत आहेत.
फोटो मेल केले आहेत.