मिरज : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज, मंगळवारी परस्परांना अपशब्द वापरल्याच्या कारणावरून योगेंद्र थोरात व डॉ. महेश कांबळे या इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची हाणामारी झाली. हाणामारीच्या घटनेमुळे पोलिसांना पाचारण करून बैठक गुंडाळण्यात आली. मिरजेतील किल्ला भागात एका हॉलमध्ये आज दुपारी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीस पक्षनिरीक्षक शहाजीबापू पाटील, राहुल पवार, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, इस्लामपूरचे नगरसेवक मुकुंद कांबळे, नलिनी पवार, शंकर गायकवाड, प्रमोद इनामदार, साजीद पठाण, आबा पाटील, अभिजित हारगे, डॉ. उषाताई दशवंत, अनिता कदम, जिल्हा परिषदेचे सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, पंचायत समिती सदस्य शंकर पाटील, अरूण राजमाने यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन पक्षनिरीक्षकांनीकेले. यावेळी इच्छुक उमेदवार योगेंद्र थोरात व महेश कांबळे समर्थक समीर सय्यद यांच्यात बाचाबाची झाली. थोरात समर्थक समाधान कांबळे, समीर सय्यद यांच्या अंगावर माईक घेऊन धावून गेल्याने सय्यद व इतरांनी कांबळे यांना मारहाण केली. भांडण सुरू असताना मध्यस्थीचा प्रयत्न करणाऱ्या योगेंद्र थोरात व डॉ. महेश कांबळे यांच्यातही धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला. हाणामारीमुळे बैठक गुंडाळण्यात आली. मात्र हॉलबाहेर दोन्ही गटाचे समर्थक पुन्हा आमने-सामने आल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. मनोज शिंदे यांनी भांडणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना तेथून पाठवून दिले. राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेतून बैठकीत हाणामारीचा प्रकार घडल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत खळबळ उडाली होती. मात्र या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
तडजोड केल्याच्या अफवेवरून वाद विवेक कांबळे यांच्यासोबत तडजोड केल्याची अफवा पसरवून समीर सय्यद यांनी बदनामी केल्याने बैठकीत बाचाबाचीचा प्रकार घडल्याचे योगेंद्र थोरात यांनी सांगितले, तर थोरात यांनी सय्यद यांना अपशब्द वापरल्याने भांडण झाल्याचे डॉ. महेश कांबळे यांनी सांगितले.