म्हैसाळ : देशात जनता कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज तालुका राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार डी. एस. कुंभार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून संपूर्ण जनतेचा विश्वासघात केला आहे. सद्यस्थितीमध्ये पेट्रोलचा दर १०६ रूपये प्रतिलीटरपर्यंत तर डिझेलचा दर जवळपास १०० रूपयांवर आहे. यामुळे देशातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिंलिंडरच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अशा मागणी करण्यात आली.
या आंदोलनाला प्रांतिक सदस्य बाळासाहेब होनमोरे, नरसिंह संगलगे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, जीवन पाटील, राष्ट्रवादीचे मिरज तालुकाध्यक्ष तानाजी दळवी, महिला तालुकाध्यक्ष अनिता कदम, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, कार्याध्यक्ष वास्कर शिंदे, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, पृथ्वीराज सावंत, भाऊसाहेब नरगच्चे, राजू सय्यद, सुरज मंगसुळे, मारूती नागरगोजे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.