इस्लामपूर येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘पंतप्रधानांना गोवऱ्या पाठविण्याचे’ अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात छाया पाटील, सुष्मिता जाधव, सुनीता देशमाने, अंकिता सावंत यांनी घोषणा दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुका आणि इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीने येथे ‘अनोख्या आंदोलना’ने गॅस दरवाढीविरोधात मोदींच्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. महिला कार्यकर्त्यांनी येथील पोस्ट ऑफिसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील पत्त्यावर शेणाच्या गोवऱ्या पाठविल्या. महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना मोदी व केंद्र सरकारविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस छाया पाटील, जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव, तालुकध्यक्षा सुनीता देशमाने, युवती तालुकाध्यक्षा अंकिता सावंत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
देशमाने म्हणाल्या, कोरोनाची लाट ओसरत आहे. मात्र, गॅस दरवाढीची लाट वाढतच आहे. गॅस सिलिंडर ९०० रुपयांच्या वर गेले आहे. मोदी सरकारने गॅस दरवाढ व महागाई कमी केली नाही, तर देशातील महिलांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल.
जाधव म्हणाल्या, गेल्या तीन वर्षांपासून केंद्र सरकार दर महिन्याला गॅस दरवाढ करीत आहे. महागाईने कळस गाठला आहे. आम्ही त्याविरोधात सातत्याने आंदोलन करीत आहोत. मात्र, सरकारवर परिणाम होत नाही. आता गोवऱ्या पाठवीत आहोत. जर दरवाढ, महागाई कमी झाली नाही, तर देशातील महिला संसदेवर धडक मारतील.
छाया पाटील म्हणाल्या, केंद्र सरकारने वाजत-गाजत उज्ज्वला गॅस योजना आणली. मात्र, गॅस दरवाढीने त्रस्त महिला भगिनी गॅस सिलिंडर घेत नाहीत. त्या पुन्हा चुलीच्या धुरात स्वयंपाक करीत आहेत. देशातील महिला केंद्र सरकारला नक्की धडा शिकवतील.
यावेळी अलका माने, पुष्पलता खरात, राजश्री गिरी गोसावी, अंकिता सावंत, सविता पाटील, माजी सभापती सुवर्णा जाधव, प्राचार्या दीपा देशपांडे, सुनीता वाकळे, सुजाता पाटील, मनीषा पाटील, संगीता पाटील, वंदना शिंदे, रेखा पाटील, शैलजा जाधव, उषा मोरे, अलका शहा, युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे, रंजना पाटील, वैशाली पाटील, मनीषा पेठकर, प्रतिभा पाटील, प्रतिभा जाधव, रेखा पवार, स्वाती कदम उपस्थित होत्या.