लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवून शेतकरी बांधवांना अडचणीत आणले, अशी टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सांगलीत निदर्शने केली.
सांगली, मिरज रोडवरील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘रासायनिक खतांच्या किमती वाढविणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिल्या. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तसेच खतांच्या दरवाढीबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवून शेतकरी बांधवांना मोठा धक्का दिलेला आहे. खतांच्या किमती भरमसाट वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपचे सरकार शेतकरीविरोधी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खतांबरोबरच केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस दरामध्ये प्रचंड मोठी वाढ केलेली आहे. डाळी आणि तेलाचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झालेली आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही या दरवाढीचा निषेध करत आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी करावी, ही आमची मागणी आहे.
शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की, कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ मागे न घेतल्यास आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात अविनाश पाटील, संजय बजाज यांच्यासह नगरसेवक विष्णू माने, शेखर माने, बाळासाहेब पाटील, राहुल पवार, आयुब बारगीर आदी सहभागी झाले होते.