फोटो ओळ : पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीचा निषेध करीत तहसीलदारांना निवेदन दिले.
इंधन दरवाढ करून कोणताच घटक समाधानी नाही; मग हे मोदी सरकार कोणाला अच्छे दिन दाखवणार आहेत? पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसाध्यक्ष मारुती चव्हाण.
पलूस : इंधन दरवाढीने महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करीत पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मारुती चव्हाण म्हणाले, शेतकऱ्याला औषध फवारणीसाठी इंधन लागते; यामुळे आधीच भरडलेल्या शेतकऱ्याला या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. तसेच वाढीव इंधनामुळे वाहतूक वाढली आणि त्यामुळे वस्तूंच्या वाहतुकीचे दरही वाढल्याने सामान्य जनतेलाही दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर रोज वाढत आहेत; त्यामुळे गृहिणींनाही घर चालविताना कसरत करावी लागत आहे.
यावेळी विनायक महाडिक, पोपट संकपाळ, दीपक मदने, किशोर माळी, अधिक थोरबोले, प्रमोद भोई, विशाल जाधव, विनोद ओणबुडे, अक्षय जाधव, नागेश पाटील, संदीप मुळीक, संदीप चव्हाण, पवन नलवडे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.