इस्लामपूर : गेल्या चार-साडेचार वर्षांत शहर विकासासाठी ११५ कोटींहून अधिक निधी विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेनेने आणला. गेली ३१ वर्षे तुम्ही खोटे बोलून विकासाची स्वप्ने दाखवली. मात्र, ही कामे आम्ही पूर्ण केली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सभागृह पारदर्शी चालविले आहे. गुंडगिरीची प्रवृत्ती असणाऱ्यांनी पावित्र्याबद्दल बोलू नये, असा पलटवार विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
पवार म्हणाले, सलग ३१ वर्षे शहरावर सत्ता अबाधित ठेवणाऱ्या राष्ट्रवादीने शहराची बारामती करण्याच्या घोषणा केल्या. सत्ता मिळाली की, बारामती विसरून करामती करण्यात व्यस्त राहिले. शहाजी पाटील यांनी शहराच्या विकासकामांबाबत बोलू नये. शहराने आपणास भरपूर संधी दिली. सत्तेचा वापर स्वहितासाठी व स्वविकासासाठी केला. नगरपालिकेच्या मालकीच्या मोठमोठया इमारती कवडीमोल दराने भाडेतत्त्वावर घेऊन नगरपालिकेचा आर्थिक तोटा केला, हे सर्व तालुक्याला ज्ञात झाले आहे. लवकरच अशा अनेक गोष्टी आम्ही प्रकाशात आणणार आहोत. प्रसिद्धीसाठी शहरवासीयांची दिशाभूल करू नका.
ते म्हणाले की, सभागृहाचे पावित्र्य जपले जात नाही. खोटे व चुकीचे बोलले जात असल्याचा आरोप करणाऱ्या शहाजी पाटील यांनी व तत्कालीन महिला मुख्याधिकाऱ्यांनी लाॅकडाऊन काळात अवैध दारूसाठ्यावर कायद्याचा बडगा उगारल्याच्या रागातून त्यांच्या अंगावर खुर्ची घेऊन जाणाऱ्या गुंड वृत्तीच्या खंडेराव जाधव यांनी नगरपालिका सभागृहातील पावित्र्याबद्दल बोलू नये. जयंत पाटील यांनी खंडेराव जाधव यांच्यासारख्या गुंडवृत्तीच्या लोकांना पुढे करून शहरात दशहत माजविण्याचा व शहरवासीयांना भयभीत करण्याचा प्रयत्न करू नये. अशा विकृत विचाराचे राजकारण शहरवासीय कधीही चालू देणार नाहीत. तुमचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आल्याने अनेक चेहरे बदनाम झाले आहेत.