लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याबाबत विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेला तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादीतर्फेे महापौरपदासाठी, तर काँग्रेसने उपमहापौरपदासाठी उमेदवार उभे करण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. बहुमताची जुळवाजुळव होते की नाही, याचा शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज घेऊन काँग्रेस नेत्यांनीही राष्ट्रवादीला बाय देण्याची मानसिक तयारी केली आहे. पण याबाबत अधिकृत घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या नव्या महापौर, उपमहापौरांची २३ रोजी निवड होणार आहे. शुक्रवारी १८ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. महापालिकेत काँग्रेसचे १९, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी आघाडीला पाच नगरसेवकांची गरज आहे. सत्ताधारी भाजपमध्ये महापौरपदावरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. विद्यमान उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह काही नगरसेवकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
त्यात राष्ट्रवादीने महापौरपदाच्या उमेदवारीवर दावा केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. पण आता या दोन्ही पक्षातील तणाव काही प्रमाणात निवळला आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादीला पुढे चाल देण्याबाबत काँग्रेस नेत्यांनी तयारी चालविली आहे. काँग्रेसकडेही महापौरपदासाठी इच्छुक नगरसेवक असले तरी बहुमताची जुळणी ते कशी करणार, असा प्रश्न नेत्यांसमोर आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने इच्छुकांनी आकड्याची जुळवाजुळव करू शकते का, अशी विचारणा केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील इच्छुक मात्र बहुमताची गणित मांडत आहेत. सत्ताधारी गटातून फुटून येणाऱ्या नगरसेवकांना सर्वप्रकारचे बळ देण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखविली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या मागे पालकमंत्री जयंत पाटील यांचे बळ आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांनी महापौरपदाचा राष्ट्रवादीचा उमेदवार तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचा उमेदवार देण्यास हिरवा कंदील दाखविल्याचे समजते.
चौकट
दोन्ही पक्षाचे सूर जुळले
काँग्रेस-राष्ट्रवादीत महापौरपदावरून निर्माण झालेला तणाव बऱ्याचअंशी कमी झाला आहे. राष्ट्रवादीकडून शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, गटनेते मैनुद्दीन बागवान यांना काँग्रेससोबत चर्चा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यांनी काँग्रेस नेत्यासह नगरसेवकांशी संपर्क सुरू केला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत दोन्ही पक्षांतील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठकही होण्याची शक्यता आहे. पण यात विशाल पाटील गटाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या गटाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला मान्यता देतात की नाही यावर पुढील गणिते ठरणार आहेत.