कवठेमहांकाळ : घाटमाथ्यावरील टेंभू योजनेच्या कामांची पाहणी आणि कवठेमहांकाळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला प्रदान केलेल्या रुग्णवाहिकेच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील यांच्याबरोबर भाजपचे प्रमुख पदाधिकारी दिसल्याने तालुक्यात राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
घाटमाथ्यावरील टेंभू योजनेच्या कामाचा पाहणी दौरा आ. सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पार पडला. यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, एम. के. पाटील, जगनाथ कोळेकर, महेश पवार यांच्यासह भाजपचे सभापती विकास हाक्के, बाजार समितीचे सभापती दादासाहेब कोळेकर सहभागी होते.
हा पाहणी दौरा होता की, राष्ट्रवादी आणि भाजपचा संयुक्त राजकीय दौरा होता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
त्यानंतर रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रमावेळीही भाजपचे पदाधिकारी अग्रभागी होते.
या दोन्ही कार्यक्रमांत राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना निरोप दिले नाहीत. त्यांना जाणीवपूर्वक डावलल्याची चर्चा आहे. या डावललेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्रित येऊन, उपाययोजना करताना दिसले नाहीत. त्यांनी एकत्रित येऊन रुग्णालय उभारलेले नाही; परंतु राजकीय कार्यक्रमांना ते एकत्रित येत आहेत.
चौकट
पक्षातच फरपट सुरू
आर. आर. पाटील यांच्या पश्चात प्रमुख कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी थांबले. त्यांच्यासाठी लढले. ते आज भाजपसोबतच्या युतीला कंटाळत दुरावले आहेत. त्यांची राष्ट्रवादी पक्षातच फरपट सुरू आहे.
चौकट
दत्ताजीराव पाटील यांना डावलले
आगळगाव येथील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य आशाराणी पाटील आणि माजी सभापती दत्ताजीराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या आमदार गटातून डावलले जात आहे. त्यांना कार्यक्रमांचे निरोप दिले जात नाहीत. त्यामुळे ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. अशी चर्चा आता आगळगाव गटात सुरू आहे.