कडेगाव : दुचाकी आणि उसाचा ट्रॅक्टर यांच्या अपघातात नेवरी (ता. कडेगाव) येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. अमोल अंकुश महाडिक (वय ३४) व सोमनाथ शिवाजी सुतार (२६) अशी मृतांची नावे आहेत. रवींद्र शंकर भिसे गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजता कोतीज (ता. कडेगाव) येथे घडली. याबाबत कडेगाव पोलिसांत रवींद्र भिसे याने फिर्याद दिली आहे. नेवरी येथील अमोल, सोमनाथ आणि रवींद्र हे तिघे मित्र दुचाकी (एमएच १० बीएल ५३४०)वरून रायगाव येथे कामानिमित्त गेले होते. तेथून नेवरीला परत येत असताना कोतीजजवळ उसाचे तीन ट्रॅक्टर येत होते. यातील दोन ट्रॅक्टर पुढे गेल्यावर तिसऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अमोलच्या दुचाकीची धडक बसली. ही धडक एवढी जोराची होती की, अमोल आणि सोमनाथ यांच्या चेहऱ्यावर, गळ्यावर उसामुळे जबर मार बसला. ते दुचाकीसह १० ते १५ फूट फरफटत गेले.अमोल जागीच ठार झाला, तर सोमनाथचा कऱ्हाडला उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. रवींद्र भिसे याच्यावर विट्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत आहे. अमोल विवाहित असून, त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सोमनाथच्या पश्चात आई, वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त गावात समजताच युवकांनी कोतीजच्या दिशेने धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. घटनेनंतर चालकाने ट्रॅक्टरसह पलायन केले. सहायक पोलीस निरीक्षक पी. एन. मोकाशी यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)
दुचाकी ट्रॅक्टरला धडकून नेवरीचे दोघे ठार
By admin | Updated: March 6, 2015 00:53 IST