सांगली : जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित व विशेष निमंत्रित असणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अकरा सदस्यांना डच्चू देण्यात आला होता. मात्र यामधील दोघे आमदार म्हणून निवडून आल्याने पुन्हा त्यांची वर्णी लागणार आहे. आता यामधील ९ सदस्यांची नियुक्ती संपुष्टात आली आहे. नव्या सरकारकडून पक्षीय राजकारण सुरु झाले असून, आता यामध्ये भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे सदस्य नियुक्त होण्याची शक्यता आहे.जिल्हा नियोजन समितीचे ३२ सदस्य असून, यामध्ये जिल्ह्यातील आमदार हे विशेष निमंत्रित, तर अकरा सदस्य हे पालकमंत्री नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करतात. तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम यांनी नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अकरा सदस्यांची नियुक्ती केली होती. यामध्ये मोहनराव कदम, सत्यजित देशमुख, बाळासाहेब गुरव, सुनील चव्हाण, हणमंतराव देसाई, महादेव पाटील, आनंदराव नलवडे, पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, अनिल बाबर यांचा समावेश होता. आता अनिल बाबर व विलासराव जगताप हे आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांचा आता विशेष निमंत्रित म्हणून समावेश होणार आहे. उर्वरित आठ जणांची नियुक्ती आता रद्द झाली आहे. तसा आदेशही जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाला आहे. पृथ्वीराज देशमुख आता भाजपवासी झाल्याने पुन्हा त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांमधील नियुक्त झालेले सर्व सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादीचेच आहेत. नव्या नियुक्तीमुळे सत्तेचे समीकरण बदलणार का? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. पाच महिन्यांपासून समितीची सभा झाली नसल्यामुळे विकास कामांवर याचा परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, काँग्रेसला डच्चू
By admin | Updated: December 22, 2014 00:17 IST