तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी तासगावात पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या दोघा प्रमुख कार्यकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. पक्षनिरीक्षक दिलीप पाटील यांच्यापुढेच हा प्रकार घडला.सावळजचे माजी जि. प. सदस्य किशोर उनउने व युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांच्यात ही शाब्दिक चकमक उडाली. बाजार समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दिलीप पाटील उपस्थित होते.निवडणुकीतील प्रचारासंदर्भात सावळजचा विषय निघाल्यानंतर हा प्रकार घडला. किशोर उनउने व ताजुद्दीन तांबोळी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी या दोघांना शांत केले. किरकोळ विषयावरून पेटलेला हा वाद कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून मिटविला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांत वाद झाल्याने या घटनेची चर्चा कार्यकर्त्यांत होती. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, प्रकार किरकोळ होता, तो आता शांत झाला आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)
तासगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची
By admin | Updated: April 3, 2015 00:37 IST