लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गॅस दरवाढीविरोधात सांगली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने चूल पेटवून, सिलिंडरच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले. दरवाढीविरोधात मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
सांगली शहर राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्यावतीने अध्यक्ष अनिता पांगम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पांगम म्हणाल्या की, केंद्र सरकारने भरमसाठ गॅस दरवाढ केली आहे. त्याची सर्वसामान्य जनतेला झळ बसत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना या गॅस दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.
इतकी आंदोलने होत असतानाही केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही. त्यामुळे जोपर्यंत ही दरवाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात वंदना चंदनशिवे, आयेशा शेख, आशा पाटील, राणी कामटे, ज्योती अदाटे, प्रियंका तुपलोंढे, सुधा कटारे, सुनीता लालवानी, अर्चना कांबळे, सुनीता काळे आदी सहभागी झाल्या होत्या.