अण्णा खोत -मालगाव (ता. मिरज) येथील राष्ट्रीय पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गावाअंतर्गत टाकलेल्या दर्जाहीन जलवाहिनीमुळे पाणी मिळत नसल्याने योजनेच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचा आरोप होत आहे.मालगाव येथे पिण्याचा पाण्याची ११ कोटींहून अधिक खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली आहे. या योजनेचे पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांच्याहस्ते उद्घाटनही करण्यात आले. मात्र या योजनेची अवस्था पूर्वीच्या प्रादेशिक योजनेसारखी होणार का, अशी शंका ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. यापूर्वी २२ गावांसाठी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. मालगावचा त्यात समावेश होता. निकृष्ट कामांमुळे या योजनेला गळतीचे प्रमाण अधिक होते. पाणीपट्टी वसुली या गळती काढण्यावर खर्च झाली. त्यामुळे पाणीपट्टीची रक्कम भरता आली नाही. परिणामी ही योजना बंद पडली. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावात गल्लोगल्ली पाणी वितरणासाठी प्लॅस्टिक वाहिनी टाकण्यात आल्या आहेत. त्या टाकण्यापूर्वी तिच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात होती. जलवाहिनीचा दर्जा अधिकाऱ्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आला होता; मात्र त्यांनी तक्रारीची दखल घेण्याऐवजी निकृष्ट वाहिनीचे समर्थन केले. गळतीमुळे दर्जाहीन वाहिनीचा पंचनामा होत आहे. पाणी पुरवठा सुरू होताच निकृष्ट दर्जाच्या वाहिन्या फुटून गळती होत असल्याच्या तक्रारी आहेत. दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे तक्रारी येत आहेत. योजनेच्या देखभाल दुरुस्तीची ठेकेदारांवर जबाबदारी असताना जलवाहिनीची गळती काढण्याकडे दुर्लक्ष आहे. गळतीच्या वाढत्या तक्रारीने ग्रामस्थ त्रस्त आाहेत. पूर्ण झालेली पेयजल योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याची ठेकेदाराला घाई झाली आहे. या अवस्थेत योजना ताब्यात घेतल्यास गळतीवर खर्च करून ग्रामपंचायत मेटाकुटीला येणार आहे. परिणामी या निकृष्ट कामांमुळे योजना अल्पजीवी ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जलवाहिन्यांचा दर्जा तपासावा व संपूर्ण कामाची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.शासनाकडे तक्रार करणार : पोतदारराष्ट्रीय पेयजल योजना कायमस्वरुपी टिकावी अशापध्दतीने अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून काम करून घेण्याची गरज होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. जलवाहिन्या दर्जाहीन असल्याने त्या फुटू लागल्या आहेत. ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने निकृष्ट कामांबाबत शासनाकडे तक्रार करणार आहे. योजनेची चौकशी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे कार्यकर्ते मधुकर पोतदार यांनी सांगितले.
मालगावची राष्ट्रीय पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात
By admin | Updated: July 30, 2015 00:29 IST