तासगाव : सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व राजारामबापू पाटील यांची नावे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, अशी मागणी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा आरपीआयचे लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदेश भंडारे यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे, मुन्ना कोकणे उपस्थित होते.
भंडारे म्हणाले, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते राजारामबापू पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावाचा उल्लेख जिल्ह्याच्या संकेतस्थळावर करावा. राज्यातील मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी समाजातील बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, वसंतराव नाईक, संत रोहिदास, अण्णासाहेब पाटील आदी आर्थिक विकास महामंडळे राज्यशासन चालवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या महामंडळाची थकीत कर्जे माफ व्हावीत, अशी मागणी राज्यभरातील मागासवर्गीय थकबाकीदार करत आहेत. राज्यशासन अनेकदा आश्वासन देऊनही थकीत कर्जे माफ करत नाही. राज्यात अनेक भांडवलदार, कारखानदार, बडे व्यावसायिक व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली; परंतु मागासवर्गीयांना कर्ज माफीपासून वंचित ठेवले गेले आहे. याबाबत गांभीर्याने दाखल घेऊन कर्ज माफ करावीत. मागासवर्गीय कर्जदाराला न्याय द्यावा.