विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : उच्च न्यायालयाचा आदेश आणि कोरोना निर्बंधांमुळे शिराळ्यात शुक्रवारी साधेपणाने नागपंचमी साजरी करण्यात आली. प्रतीकात्मक नागमूर्तीची मिरवणूक, अंबामातेच्या मंदिरात दर्शन, पालखीचे दर्शन यावर बंदी होती. त्यामुळे मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा, पालखीची पूजा करण्यात आली. महिलांनी घरीच नागमूर्तीची पूजा केली.
भक्ताविना रिकामे अंबामाता मंदिर, सुनेसुने रस्ते, बसस्थानक, वाहनतळ, नाग स्टेडियम अशा वातावरणात शिराळ्यातील नागपंचमी सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने साजरी करण्यात आली. अंबामाता मंदिरात देवीचे दर्शन न मिळाल्याने महिला, नागमंडळाचे सदस्य, नागरिकांत नाराजी होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले. यामुळे प्रतीकात्मक मूर्तीची मिरवणूक, अंबामाता मंदिरातील देवीचे दर्शन यावर बंदी होती. सकाळी पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. दुपारी दोनच्या दरम्यान प्रमोद महाजन, रामचंद्र महाजन, स्वानंद महाजन यांच्या घरी मानाच्या पालखीची पूजा, आरती करून मोजक्या मानकऱ्यांच्या समवेत पालखी मंदिरात नेऊन तेथे पूजा करण्यात आली. त्यानंतर ही पालखी पुन्हा महाजन यांच्या घरी नेण्यात आली.
यावर्षीही दोन ड्रोनद्वारे शिराळा शहर, तडवळे, उपवळे, मोरणा धरण, ओझर्डे, कुरळप, सुरुल या संवेदनशील गावांवर लक्ष ठेवण्यात आले होते.
प्रांताधिकारी ओंकार देशमुख, विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार गणेश शिंदे, उपवनसंरक्षक विजय माने, नगराध्यक्षा सुनीता निकम, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, मुख्याधिकारी योगेश पाटील, उपनगराध्यक्ष विजय दळवी, सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी, सागर गवते, एस. डी. निकम, एन. एस. कांबळे, एस. के. लाड यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.