तासगाव : तासगाव शहरासह परिसरात शुक्रवारी साधेपणाने नागपंचमी साजरी करण्यात आली. शहरासह विविध ठिकाणी नागराजांच्या मूर्तीचे महिलांनी पूजन केले. नागपंचमीनिमित्त शहरासह परिसरात नाभिक समाज बांधवांनी व्यवसाय बंद ठेवले होते.
तासगाव शहरात प्रतिवर्षी मोठया उत्साहात नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीनिमित्त मानकरी असलेल्या नाभिक समाज बांधवांच्यावतीने नागराज गल्ली येथे गुरुवारी रात्रीपासूनच नागराजांची मूर्ती बनवण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी रात्री नागराजांच्या दोन मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण झाले. या मूर्तीची विधीपूर्वक आरती करण्यात आली. यासाठी जयवंत खंडागळे, सुदाम खंडागळे, मोहन खंडागळे, प्रवीण जाधव, सतीश ऊर्फ पांडू गायकवाड, अमोल गायकवाड, पवन गायकवाड, स्वप्निल गायकवाड, नितीन गायकवाड, मंथन खंडागळे, हरी खंडागळे, सार्थक गायकवाड, ऋषिकेश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
शुक्रवारी सकाळी या मूर्तीचे नागराज गल्ली येथे पूजन करण्यात आले. सोमवार पेठ–दाणे गल्ली येथे गणपती मंदिर चौक येथे या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी या दोन्ही मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. वरचे गल्ली येथेही नाभिक समाज बांधवांनी नागराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.