मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनतर्फे युसूफ मेस्त्री यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मौलाना आझाद विकास महामंडळासाठी शासनाने अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याबद्दल मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून अभिनंदन केले. त्याचबरोबर निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केली.
ऑर्गनायझेशनने मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामंडळासाठी भरीत तरतुद करावी म्हणून संघटना पाठपुरावा करत आहे. त्याची दलखल घेत अर्थसंकल्पात तरतूद केली, पण ती अत्यंत तुटपुंजी आहे. त्यातून तरुणांना भरीव स्वरुपाचे अर्थसहाय्य करता येणार नाही. महामंडळामार्फत मुस्लिमांसोबतच नवबौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी समुदायालाही मदत मिळते. या सर्वांसाठी फक्त २०० कोटी रुपये म्हणजे अल्पसंख्यांकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.
या निधीमध्ये वाढ करावी. थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, बीज भांंडवल कर्ज योजना, मायक्रो फायनान्स योजना पुन्हा सुरू कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. संघटनेतर्फे युसूफ मेस्त्री यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली.