फोटो : १३०८२०२१एसएएन०१ : दरीबडची (ता. जत) येथील तरुणाचा मृतदेह सापडलेल्या घटनास्थळी गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : दरीबडची (ता. जत) येथील तरुणाचा खून करून वनक्षेत्रातील निर्जनस्थळी मृतदेह टाकल्याचे शुक्रवारी आढळून आले. दिलीप महादेव वाघे (वय २६) असे त्याचे नाव आहे. अपघाताचा बनाव करून त्याच्या शरीरावर मारहाण केलेली दिसून आली. वाळू तस्करीतून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरीबडची-जालिहाळ खुर्द रस्त्यावर वनक्षेत्र आहे. वनातून संखला जाणारा कच्चा रस्ता आहे. दिलीप दरीबडची तिल्याळ रस्त्यावर गावापासून दीड किलोमीटरवर आई-वडिलांसमवेत शेतात राहतो. त्याचा स्वतःचा ट्रॅक्टर असून, तो वाळू वाहतूक करत होता. त्याचा ट्रॅक्टर काही महिन्यांपूर्वी अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी पकडला होता. त्यातून शेतीवर बोजा चढविण्यात आला आहे. पिसाळ यांची बदली झाल्यानंतर दिलीपने पुन्हा वाळू तस्करी सुरू केली होती. गुरुवारी रात्री नऊ वाजता काहीजणांनी दूरध्वनी करून त्याला घरातून बोलावून घेतले होते. तो दुचाकीवरून (एमएच १० सीजे ३२४४) अंगात जर्किन घालून गेला होता. मात्र, रात्री घरी झोपायला आला नव्हता. वाळूसाठी तो रात्री सतत जात असल्यामुळे घरच्यांंना कोणताही संशय आला नाही.
शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह दिसून आला. त्याच्या अंगावर दुचाकी पडलेल्या अवस्थेत होती. त्याच्या शरीरावर काठीने व पाईपने मारल्याच्या खुणा दिसून आल्या. खांद्यावरही घाव होता. शवविच्छेदन अहवालात मारहाणीतच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एका ठिकाणी मारहाण करून मृतदेह वनविभागातील निर्जनस्थळी ठिकाणी टाकल्याचे दिसून आले. दिलीपच्या शर्टाच्या खिशात मोबाईल आढळून आला.
घटनास्थळी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अप्पासाहेब कोळी, सहायक निरीक्षक गोपाळ भोसले व महेश मोहिते, युवराज घोडके यांनी पंचनामा केला. वाळू तस्करीतून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वनक्षेत्रात दुसरा खून आणि अपघाताचा बनाव
या वनक्षेत्रात २०१३ ला मायलेकीचा दुहेरी खून झाला होता. त्यानंतर हा दुसरा खून झाला आहे. वनक्षेत्रापासून वस्त्या लांब आहेत. त्यामुळे घटनेची माहिती मिळत नाही. मृतदेहच्या अंगावर दुचाकी गाडी टाकून अपघात झाल्याचे भासविण्यात आले आहे.
एकुलता मुलगा
दिलीप वाघेचे कुटुंब मूळचे आसंगी तुर्क गावचे आहे. ते दरीबडचीत वीस वर्षांपासून शेत घेऊन राहात आहेत. आई-वडिलांना दिलीप एकुलता मुलगा होता.