इस्लामपूर : खरातवाडी (ता.वाळवा) येथे उसाचा फड पेटविल्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी पाइप आणि काठीने हल्ला चढवत एकाच्या डोके फोडून त्याला गंभीर जखमी केले, तर चौघांना मारहाण केली. याबाबत पाच जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री ८.३०च्या सुमारास घडली.
या प्रकरणी संग्राम श्यामराव मदने (वय ३१) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून अमर शंकर खरात, अजित शंकर खरात, सचिन शंकर खरात, शंकर शामराव खरात, ओंकार तुकाराम खरात (सर्व रा. खरातवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मदने आणि खरात यांची शेती शेजारी-शेजारी आहे. उसाच्या फड पेटविल्याच्या कारणातून अमर खरात व शहाजी खरात याच्यामध्ये मारामारी झाली. यावेळी हल्लेखोरांनी यांना मस्ती आली आहे, आता या सर्वांना जिवंत सोडू नका, असे म्हणत लोखंडी पाइप व काठीने हल्ला चढविला. यामध्ये सागर मदने याच्या डोक्यात लोखंडी पाइप मारल्याने तो रक्तबंबाळ झाला, तर अमोल याला डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. शहाजी खरात, अधिक खरात हे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक डी.पी. शेडगे अधिक तपास करीत आहेत.