सांगली : शहरातील गोकुळनगर येथे तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गणेश दादासाहेब पांढरे (वय २२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी पांढरे हा गवंडी काम करतो. गुरुवारी तो कर्नाळ येथे कामाला गेला होता. सायंकाळी कामावरून परतल्यानंतर तो टिंबर एरिया परिसरात थांबला होता. तो चालत गोकुळनगरमध्ये मावा आणण्यासाठी गेला. संशयित हल्लेखोर तेथे आले. त्यातील एकाने कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून पांढरेवर हल्ला केला.
दरम्यान, उर्वरित दोघा संशयितांनीही पांढरेला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी जखमी पांढरे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जखमी पांढरे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.